केशर आंब्याला बसणार अवकाळीचा फटका

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वार्‍यामुळे मराठवाड्याचा हापूस म्हणून ओळखल्या जाणारा केशर आंबा उत्पादक संकटात सापडले. यामुळे शेतकर्‍यांची चिंता वाढली. फळगळ झाली असून यंदा उत्पादनात सरासरी ६० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता ज्येष्ठ फळबाग शास्रज्ञ भगवान कापसे यांनी व्यक्त केली.
सततच्या पावसामुळे आंब्याची फलोत्पादनाची प्रक्रिया उशिराने सुरू झाली. त्यातच आता आंबा पिकाचा मोहर ते फळधारणा हा महत्त्वाचा टप्पा सुरू असताना आलेल्या अवकाळी पावसामुळे फुलांचे नुकसान झाले आहे. यंदाच्या हंगामात २०२५ मध्ये मे महिन्यातच पावसाळा सुरू झाला. त्यामुळे गत हंगामात काही भागांत आंबा उशिराने उतरवला गेला. त्यामुळे पुढील हंगामाची मशागत, झाडांना पालवी फुटण्याची प्रक्रियादेखील उशिराने सुरू झाली. पुढे थंडीही १५ दिवस उशिरा सुरू झाली आणि ती कायम राहिली. त्यामुळे आंब्याचा मोहर व पोलन प्रक्रियेला पोषक चातावरण मिळाले नाही. त्यातच आता अवकाळी पावसाचाही फटका बसणार आहे. परिणामी, यंदा मराठवाड्याच्या आंबा उत्पादनात ६० टक्क्यांपर्यंत घट, तसेच आंब्याच्या गुणवत्तेवरही परिणाम होईल. शेतकर्‍यांना एकरी ५ ते ६ टनामागे ९ लाखांपर्यंत उत्पन्न होते. यंदा मात्र उत्पादन घटून शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसेल, असे चित्र आहे.